बीड जिल्ह्यातील नद्या
बीड:नद्या
गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. ती जिल्ह्याच्या गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यांतून वाहत जाते.
जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात.
मांजरा ही बीड जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. ही नदी पाटोदा तालुक्यातील हरिश्चंद्र बालाघाटच्या पर्वतरांगामध्ये उगम पावते. ही नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बर्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे काम केले आहे. मांजरा नदी सुमारे ७२५ कि.मी. अंतराचा प्रवास करत आंध्र प्रदेशात जाऊन गोदावरी नदीस मिळते. बीड जिल्ह्यातील केज, रेना, लिंबा व चौसाळा या मांजरा नदीच्या उपनद्या असून त्या बालाघाटच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावून जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळतात.
सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यांत उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण सिधंफणा नदीवर आहे.
बिंदुसरा नदी बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावते. ही सिधंफणाची एक उपनदी आहे. बिंदुसरा नदीवर बीडजवळ जिल्ह्यातील मोठा धरणप्रकल्प आहे. ही नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेस मिळते. पुढे सिंदफणा गोदावरीला मिळते.
कुंडलिका ही सिंधफणेची एक उपनदी बीड जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणेस मिळते.
सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले. आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाते. पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका

Comments
Post a Comment